अफगाणिस्तानमधील शाजोय येथे बुधवारी बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत रॉकेटचा स्फोट झाल्याने सहा लहान मुलांचा मृत्यू झाला.

जाबूल प्रांतातील शाजोय येथे बुधवारी दुपारी स्फोट झाला. रस्त्यालगत पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला असून या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. तर २ जण यात जखमी झाले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दुसऱ्या घटनेत लाघमन येथे लहान मुलांना एक रॉकेट सापडला होता. त्याच्याशी परिसरातील सहा लहान मुलं खेळत होती. मात्र, या दरम्यान रॉकेटचा स्फोट झाला आणि सहा लहान मुलांचा मृत्यू झाला. यातील चार मुली या एकाच कुटुंबातील आहेत. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील संघर्षादरम्यान हा रॉकेट तिथे पडला असेल. मात्र, त्यावेळी रॉकेटचा स्फोट झाला नसावा, असे अंदाज स्थानिक प्रशासनाने वर्तवला आहे.

मंगळवारी रात्री देखील जाबूल प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला होता. यात ११ सैनिकांचा मृत्यू झाला.