अफगाणिस्तानमधील पंजशीरच्या खोऱ्यात तालिबान आणि नॉर्दन अलायन्स तसेच माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये सुरु असणारं युद्ध संपुष्टात आल्याची घोषणा तालिबानने केली. पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. आम्ही हा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. याच विजयासोबत अफगाणिस्तानमधील संपूर्ण युद्धविराम लागल्याची घोषणा तालिबानने जारी केलेल्या पत्रकात केली. यावेळी तालिबानने इशारा देखील दिला आहे. “जर कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीरप्रमाणे हाताळले जाईल”, असा इशारा तालिबान्यांनी दिला आहे.

तालिबानने इशारा दिला आहे की जो कोणी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याला पंजशीर प्रतिरोधक दलांप्रमाणे हाताळले जाईल. पंजशीर हा तालिबानविरोधी शक्तींचा शेवटचा बालेकिल्ला होता. तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पंजशीरवर ताबा मिळवला आहे. परंतु आघाड्यांनी हा दावा फेटाळून लावला.

तालिबानने म्हटले आहे की, “आम्ही हा प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला. काबूलमधून पळून गेलेल्या लोकांना अजूनही वाटते की ते तालिबानशी लढू शकतात. आता आशा आहे की आम्हाला कायमची शांतता मिळेल. जर कोणी आता समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला  तर त्यांना आम्ही पंजशीरला दिले तसे चोख उत्तर देऊ,”

पंजशीरही जिंकलं

दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने एक पत्रक देखील जारी केलं आहे. “आमच्या शत्रूच्या ताब्यात असणारा पंजशीर प्रांत आम्ही पूर्णपणे ताब्यात घेतलाय. देवाने आणि देशाने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर देशातील प्रत्येक प्रांताला सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही करत असणाऱ्या या प्रय़त्नांना यश आलं आहे,” असं पत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा –  पंजशीरही जिंकलं : “देश युद्धातून पूर्णपणे बाहेर पडला असून आता नागरिक शांततेत, स्वातंत्र्यामध्ये आणि…”; तालिबानचा दावा

नॉर्दन अलायन्ससाठी लढणाऱ्या अनेकांना आम्ही मारहाण केली तर बरेच जण पळून गेल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. तसेच पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची सुटका करण्यात आम्हाला यश आल्याचा आनंद आहे, असा दावाही तालिबानने केलाय. “त्यांची सुटका करण्यात आली आहे. तसेच पंजशीरमधील सर्व नागरिकांचा सन्मान केला जाईल. त्यांच्याशी दुजाभाव केला जाणार नाही. ते सर्वजण आमचे बांधव आहेत. आमच्या देशाची सेवा करणं हे आमचं समान उद्दीष्ट आहे. या नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे देश युद्धामधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता देशातील नागरिक शांततेत, स्वातंत्र्याच्या वातावरणात आणि मुक्तपणे समृद्धी असणारं जीवन जगतील,” असा विश्वास तालिबानने व्यक्त केला.