काश्मीर प्रश्नाला अफगाणिस्तानच्या शांती प्रक्रियेशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तानने फटकारले आहे. काश्मीर मुद्दयाचा अफगाण-तालिबान शांती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो हा दावा फेटाळून लावताना पाकिस्तानकडून काहीही सबब दिली जातेय असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान तालिबान विरोधात कुठलीही कारवाई न करता स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय. पाकिस्तानने जे मत व्यक्त केलेय त्यातून त्यांचा निष्काळजीपणाच दिसतो असे मत अफगाणिस्तानने म्हटले आहे.

काश्मीर भारत आणि पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा आहे. पाकिस्तान त्यांच्या भूमीवर दहशतवादाचे कारखाने चालवतोय. तिथून तयार होणारे दहशतवादी अफगाणिस्तानला पाठवले जातात. त्यामुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो असे अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या दूतावासाने आपल्या निवदेनात म्हटले आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद माजीद खान यांनी भारताबरोबर तणाव वाढल्यास अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेले सैन्य पीओकेमध्ये हलवावे लागेल असे वक्तव्य केले होते. त्यावर अफगाणिस्तानने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाकिस्तान युद्धासारखी स्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला संयुक्त राष्ट्रातही पाकिस्तानला किंमत मिळाली नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे त्याची कबुली दिली आहे.