तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढले आहेत. तालिबान्यांनी शाळकरी मुलींना शाळेत स्वत: उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे. मात्र आता या निर्णयाविरोधात तेथील शाळकरी मुलांनी भूमिका घेतली आहे. एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनीदेखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील काही शाळकरी मुलं घरीच थांबली असून जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत आपणही शाळेत जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बारावीत शिकणाऱ्या १८ वर्षीय रोहुल्लाहने म्हटलं आहे की, “महिलांमुळे समाज पूर्ण होतो. जोपर्यंत मुलींसाठीही शाळा उघडल्या जात नाहीत तोवर मीदेखील जाणार नाही”.

“मुली सकाळी तर मुलं संध्याकाळी अभ्यास करतात. मुलांसाठी पुरुष शिक्षक असून मुलींसाठी महिला शिक्षक आहेत,” अशी माहिती एका शिक्षकाने दिली आहे. दरम्यान काही शिक्षकांनी सांगितल्यानुसार, ज्या मुलींचा उत्साह कमी आहे त्या अजूनही शाळा सुरू करण्यासंबंधी विचार करत आहेत.

“मुली शिकल्यामुळे पिढ्या घडत असतात. मुलाच्या शिक्षणाचा कदाचित कुटुंबाला फरक पडतो. मात्र मुलीच्या शिक्षणाचा परिणाम समाजावर होतो,” असं शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितलं. मुलींना शिक्षण मिळावं आणि त्यांनी ते पूर्ण करावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने शाळांना फक्त मुलं आणि पुरुष शिक्षकांसाठी सुरु करण्याची परवानगी दिली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून शाळा सुरु करण्याची घोषणा करताना कुठेही मुलींचा उल्लेख नव्हता. संयुक्त राष्ट्रानेही मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.