अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये राष्ट्रीय वाहिनी आणि रेडिओ प्रक्षेपण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून १६ जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे.

अफगाणिस्तानमधील पूर्व भागात जलालाबाद शहरात राष्ट्रीय वृत्तवाहिनी आणि रेडिओ प्रक्षेपण केंद्र आहे. या केंद्रावर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हातात एके ४७ घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करत केंद्रात प्रवेश केला. यानंतर सुरक्षा यंत्रणांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यातील दोघांनी स्वतःला उडवून दिले. तर एका दहशतवाद्यासोबत अजूनही सुरक्षा दलासोबत चकमक सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांची नेमकी संख्या किती याविषयी संभ्रम आहे. सध्या सुरक्षा दलाचे पथक केंद्रातील प्रत्येक खोलीची तपासणी करत असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

जलालाबादमधील केंद्रात सुमारे ४५ कर्मचारी काम करतात. हल्ल्यानंतर यातील काही जणांना इमारतीबाहेर पळ काढण्यात यश आले. तर काही जण इमारतीमध्ये अडकून पडले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याने अफगाणमधील नानगरहर प्रांतातील आयसिसचा वाढत्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

गेल्या महिन्यात अमेरिकेने अफगाणमधील आयसिसच्या तळांना लक्ष्य केले होते. अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’चा वापर केला होता. या हल्ल्यात आयसिससे ३० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. यानंतरही आयसिसच्या कारवाया कमी होताना दिसत नाही.