अफगाणिस्तानमधील काबूल हे शहर तीन दिवसांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. सोमवारी सकाळी काबूलमधील लष्करी विद्यापीठावर हल्ला झाला असून या हल्ल्यात ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण जखमी झाले आहेत.

काबूलमधील मार्शल फहिम लष्करी विद्यापीठावर सोमवारी सकाळी पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. विद्यापीठाच्या प्रवेश द्वाराजवळच दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवला. तर उर्वरित तिघांनी गोळीबार करत विद्यापीठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तान सैन्याच्या सैनिकांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर एकाला जिवंत पकडण्यात यश आले. सुमारे पाच तास ही चकमक सुरु होती. या हल्ल्यानंतर विद्यापीठाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या परिसरात कसून शोधमोहीम राबवली जात आहे.

काबूलमध्ये शनिवारीच रुग्णवाहिकेत स्फोट घडवण्यात आला होता. यात १०३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २३५ जण जखमी झाले होते. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. रविवारी अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता. यामुळे ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते. आठवडाभरातील काबूलमधील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.