निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि.१९) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास १७ ते १८ तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदींनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बऱ्याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असं यावेळी मोदी म्हणाले.

‘देवदर्शनाला आल्यानंतर मी देवाकडे काही मागत नाही. देवाकडे काही मागण्यावर माझा विश्वास नाही. देवाने आपली निर्मिती देण्यासाठी केली आहे, मागण्यासाठी नाही’ असं केदारनाथमध्ये रात्रभर गुहेत ध्यानधारणा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोदी म्हणाले. याशिवाय पुढे बोलताना, निवडणुकीच्या धामधुमीनंतर मला येथे ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली. आध्यात्मिक क्षेत्राला जाण्याची संधी मिळाली. केदारनाथच्या विकासासाठी कामं सुरु आहेत, येथे काम करण्याची संधी कमी मिळते. येथील विकासकामांवर माझे कायम लक्ष असते, असं म्हटलं.


लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला.
मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदी आज (रविवारी) बद्रिनाथलाही भेट देणार आहेत.

दरम्यान, मोदींच्या या देवदर्शनावर विरोधकांनी टीका केली आहे. मोदींनी कितीही देवदर्शन घेतले, तरीसुद्धा भाजपचा पराभव अटळ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.