राजस्थानच्या ढोलपूर जिल्ह्यातील राजघाट गावात जेव्हा २३ वर्षांचा पवन कुमार मध्य प्रदेशातून वधूला घेऊन आला तेव्हा गावकऱ्यांमध्ये एक वेगळा आनंद, उत्साह होता. जणू आपल्याच घरात लग्न आहे अशी प्रत्येक गावकऱ्यांची भावना होती. त्यामागे कारणही तसेच आहे. पवन कुमारच्या विवाहामुळे राजघाट गावातील गावकऱ्यांना तब्बल २२ वर्षांनी लग्न सोहळयाचा आनंद अनुभवता आला. इतर गावांप्रमाणे राजघाट गावात मुला-मुलींची लग्ने सहज जुळत नाहीत. त्याचे कारण आहे त्या गावची परिस्थिती.

गावची परिस्थिती दयनीय असल्यामुळे राजघाटमध्ये पालक आपल्या मुलीचे लग्न त्याच गावातील मुलांबरोबर लावून देत नाहीत. राजघाट गाव अजूनही प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे. गावच्या या दयनीय परिस्थितीमुळे मागच्या २२ वर्षांपासून या गावात एकही लग्न झाले नव्हते. पवन कुमारच्या लग्नामुळे या गावातील गावकऱ्यांना विवाहसोहळयाच आनंद घेता आला. या गावामध्ये शेवटचे लग्न १९९६ साली झाले होते. राजघाट गाव ढोलपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. चंबळ नदीच्या तीरावर वसलेल्या या राजघाट गावाची लोकसंख्या फक्त ३५० आहे. या गावामध्ये रस्ते, वीज, पाणी आणि वैद्यकीय सेवा या प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. फक्त एक सरकारी प्राथमिक शाळा आहे जिथे काही विद्यार्थी जातात. अजूनही या गावात वीज पोहोचलेली नाही. सूर्य मावळल्यानंतर या संपूर्ण गावात अंधार पसरतो.

या गावामध्ये आता कुठे सुधारणांना सुरुवात झाली आहे. त्याचे श्रेय अश्वनी पाराशर या शेवटच्या वर्षाला असलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला जाते. त्यानेच मागच्या वर्षी राजघाट गावच्या या परिस्थितीबद्दल राजस्थान उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गावच्या स्थितीबद्दल माहिती दिली. #SaveRajghat म्हणून त्याने सोशल मीडियावर कॅम्पेनही चालवले होते. त्याच्या या प्रयत्नानंतर आता कुठे या गावात सुधारणांना सुरुवात झाली आहे.