मध्य कर्नाटकात दावणगेरे येथे एका दलित लेखकाने जात व्यवस्थेविरुद्ध लिहिल्याने त्याच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. विवेकवादी लेखक एम.एम.कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर तीन महिन्यांतच ही घटना घडली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येविरोधात साहित्य अकादमी पुरस्कार परत करून निषेध चालू असतानाच आता या तरूण लेखकावर हल्ला झाला आहे.
दावणगेरे विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी असलेल्या हुचंगी प्रसाद या तेवीस वर्षांच्या तरुणाने वर्षभरापूर्वी एक पुस्तक लिहिले होते. त्याचा राग मनात ठेवून एक अज्ञात व्यक्ती विद्यापीठाच्या अनुसूचित जाती जमाती वसतिगृहात आली व प्रसाद यांना तुमची आई गंभीर आजारी आहे, तिला रुग्णालयात ठेवले आहे असे सांगितले व माझ्या मागोमाग चला असेही बजावले. या व्यक्तीने प्रसाद याला त्याच्या आईस उपचारार्थ ठेवलेल्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले. नंतर वाटेत एपीएमसी यार्ड भागात आल्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. जात व्यवस्थेविरोधात लिहिल्याने तू िहदू विरोधी आहेस असे सांगून त्यांनी माझ्या तोंडावर कुंकू फासले. चाकू धाक दाखवून पुन्हा लिहिलेस तर बोटे छाटून टाकू असा दमही दिला. नंतर त्याने कशीबशी त्या टोळक्याच्या तावडीतून सुटका करून घेतली व जंगलात पळाला. काही तासांनी ते टोळके गेल्यावर तो पुन्हा वसतिगृहात आला व नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे व अनुसूचित जाती जमाती कायदा १९८९ अन्वये काही कलमे लावली आहेत.
हा दलित तरूण लेखक दावणगेरे जिल्ह्यातील सांतेबनूर येथील असून त्याचे आईवडील रोजंदारी कामगार आहेत. बालपणी हा लेखक तेथे वेठबिगार म्हणून काम करीत होता. चिन्नारा अंगला शाळेत शिक्षण सुरू केल्यानंतर त्याने जात व्यवस्थेविरोधात लेखन सुरू केले.
आडोला किच्चू या पुस्तकात त्याने जात व्यवस्था हा िहदू धर्माचा भाग असल्याचे म्हटले होते त्यामुळे त्याला धमक्याही आल्या होत्या.