बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये ११० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या सनाला ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी तीन वर्षांच्या या चिमुकलीला अथक बचाव कार्यानंतर सुखरूपपणे बाहेर काढले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. सनाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिच्या आईने सर्वांचे आभार मानले. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

११० फूट खोल बोअरवेलमध्ये ती साधारण ४३ फूटांवर अडकली होती. बचावपथकाने त्या बोअरवेलच्या समांतर खड्डा खोदून सनाची सुटका केली. सिलेंडर आणि पाइपच्या सहाय्याने तिच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जात होता, तसंच कॅमेऱ्याद्वारे तिच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. मात्र, मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. जसजसा वेळ जात होता तसतशी सर्वांची चिंता वाढत होती. अखेर 31 तासांच्या बचाव कार्यानंतर एनडीआरएफचे पथक या चिमुकलीपर्यंत पोहोचले. बचाव कार्यादरम्यान मुलीचा पाय अडकलेला असल्याने तिला बाहेर आणण्यात थोडा उशीर झाला.

मुंगेर शहरामध्ये भर वस्तीत असणाऱ्या बोअरवेलमध्ये ही मुलगी काल संध्याकाळच्या सुमारास पडली. त्यानंतर एकच गोंधळ झाला. स्थानिक प्रशासनाने तातडीने या परिसरातील वाहतूक आणि रहदारी थांबवून त्या मुलीला बाहेर काढण्यासाठी यंत्रणांना पाचारण केले होते.
सना बोरवेलमध्ये पडल्यानंतर मंदिर-मशिद आणि गुरुद्वारांमध्ये तिच्या सुखरुपतेसाठी लोक कामना करत होते. ३० तासानंतर सना बाहेर आल्यावर आईने प्रथम तिला कुशीत घेतले आणि सनासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचे व बचावपथकाचे आभार मानले.