मध्यप्रदेशमधील लोक न्यायलयामध्ये एका ४१ वर्ष जुन्या चोरीच्या प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. या प्रकरणामध्ये २० रुपयांच्या चोरीचा आरोप असलेल्या व्यक्तीची ४१ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी अनिल कुमार नामदेव यांनी ४१ वर्ष जुन्या प्रकरणात चोरीचा आरोप असणाऱ्या इस्माइल खानची निर्दोष मुक्तता केली आहे. या पुढे कोणत्याही प्रकारच्या बेकायदा कामामध्ये सहभाग घेणार नाही असं इस्माइलकडून लिहून घेत त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

काय आहे प्रकरण

तक्रारकर्ता बाबुलाल यांनी इस्माइल खानविरोधात १९७८ साली २० रुपये चोरल्याची तक्रार दाखल केली होती. बसच्या रांगेत तिकीट काढण्यासाठी उभे असताना इस्माइलने माझ्या पाकीटातील २० रुपये चोरल्याचा आरोप बाबुलाल यांनी केला होता. तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा तक्रारदार बाबुलाल २० वर्षांचे होते तर इस्माइल यांचे वय २७ वर्षे होते. आज निकाल लागला तेव्हा बाबुलाल यांचे वय ६१ वर्ष आहे तर इस्माइल हे ६८ वर्षांचे आहेत.

‘१९७८ साली मी इस्माइलविरोधात तक्रार दाखल केली त्यावेळी खान याला अटक करण्यात आली नंतर काही महिन्यांनी जामीनावर त्याची सुटका करण्यता आली. तेव्हापासून तो कोर्टामध्ये सुनावणीसाठी यायचा. मात्र २००४ पासून त्याने सुनावणीसाठी येणे बंद केले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. अखेर एप्रिल २०१९ ला इस्माइलला अटक करण्यात आली. मागील तीन महिने त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते,’ अशी माहिती बाबुलाल यांनी दिली.

…आणि प्रकरण निकाली काढले

खान हा खूप गरीब असून तो एकटाच आहे. त्याची आर्थिक परिस्थीतीही अगदीच हालाखीची आहे. जामीन मिळवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळेच प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी लोक न्यायलयामध्ये आम्हाला सुनावणीसाठी बोलवले होते. दोघांच्या संमतीने हे प्रकरण निकाली काढण्यात आले अशी माहिती बाबुलाल यांनी दिली.