सर्व विद्यापीठांमध्ये साधारणपणे दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. पण भारतातील प्रतिष्ठित दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मागील ४६ वर्षांत असे झालेले नाही. पण यंदापासून ही प्रथा पुन्हा सुरू केली जाणार आहे.

जेएनयूमध्ये ४६ वर्षांनंतर दुसऱ्या दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी विद्यापीठात पहिला आणि शेवटचा दीक्षांत समारंभ हा वर्ष १९७२ मध्ये झाला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व्ही सी कोषी यांच्या कथित चिथावणीखोर भाषणामुळे वाद निर्माण झाला होता. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या भाषणाचीही खूप चर्चा झाली होती.

या दीक्षांत समारंभात पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे जेएनयूचे रेक्टर प्रा. सतीशचंद्र गरकोटी यांनी सांगितले. दीक्षांत समारंभाची तारीख अजून ठरलेली नाही. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजन केले जाऊ शकते, असे सांगितले जाते. पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी आपला प्रबंध जमा करावा आणि तसेच जावे अशी आमची इच्छा नाही. त्यांना सन्मानपूर्वक निरोप मिळायाला हवा, असेही गरकोटी म्हणाले.

या कार्यक्रमात कोण भाषण करेल हेही निश्चित नसल्याचे समजते. गरकोटी म्हणाले, सर्वसाधारणपणे विद्यापीठाचे पाहुणे भाषण करतात. आमचे प्रमुख पाहुणे हे राष्ट्रपती असतील. जर ते उपलब्ध नाही झाले तर एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीबाबत विचार केला जाईल.

जेएनयूमधील स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य सुनीत चोप्रा यांनी १९७२ मधील दीक्षांत समारंभातील आठवण सांगितली. ते म्हणाले, प्रशासनावर हल्लाबोल करण्याची आमची योजना होती. बाहेरील सदस्याला कार्यक्रमात बोलण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी आमची भूमिका होती. नंतर बलराज सहानी यांचे नाव समोर आले. त्याचवर्षी आम्ही कॅम्पसमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यात त्यांची चित्रपटे दाखवण्यात आली होती. त्यामुळे सहानींच्या नावावर आम्ही सहमत झालो होतो, असे त्यांनी म्हटले.