उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादमधील मोहम्मदाबाद येथे १५ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी खात्मा केला आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ८ तासांच्या या थरारनाट्यानंतर १५ मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या एनएसजी कमांडो आणि पोलिसांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बक्षिस जाहीर केलं आहे.

या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली. काही लोकांनी आरोपीच्या गरावर दगडफेक केली. यामध्ये आरोपीच्या घराचा दरवाजा तुटला आणि याचाच फायदा पोलिसांना झाल्याचं सांगण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीनं त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी.सिह यांनी दिली.

यावेळी आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला. तसंच बॉम्बही फेकले. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी एनएसजी कमांडोंची मदत घेण्याचा निर्णय घेतला. एनएसजी कमांडोंचे एक पथक दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुलांची सुखरूप सुटका करणाऱ्या पोलिसांना उत्तर प्रदेश सरकारनं १० लाखांची बक्षिस जाहीर केलं आहे. यापूर्वीही या माथेफिरूनं २००१ मध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. परंतु तो जामीनावर बाहेर आला होता, अशी माहिती ओ.पी.सिंह यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
ज्या माथेफिरुने मुलांना आणि महिलांना घरात ओलीस ठेवलं होतं त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं होतं. मात्र नंतर त्याने देशी कट्टा आणि बॉम्ब यांच्या मदतीने या सगळ्यांना ओलीस ठेवलं होतं.