देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी क्वारंटाइन होण्यासही सांगितलं आहे. यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही करोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे त्रिपुराच्या मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. “माझी करोना चाचणी सकारात्मक आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घ्यावं,” असं ते म्हणाले. तर दुसरीकडे त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील दोन जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. “माझ्या कुटुंबातील दोन जणांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. तर अन्य काही जणांचा अहवाल नकारात्मक आला आहे. माझीदेखील करोना चाचणी झाली असून चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. काळजीसाठी मी होम आयसोलेशमध्ये आहे,” अशी माहिती बिप्लब कुमार देब यांनी ट्विटद्वारे दिली.

आणखी वाचा- चिंताजनक… सलग दुसऱ्या दिवशी भारतामध्ये आढळले अमेरिकेपेक्षा अधिक करोनाबाधित

येडियुरप्पांना करोनाची लागण

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं होती.

आणखी वाचा- मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण

अमित शाह यांनाही लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला अहवाल सकारात्मक आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली होती. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आणखी वाचा- एकाच दिवसात पाच भाजपा नेते करोना पॉझिटिव्ह

करोनाची लागण झालेले दुसरे मुख्यमंत्री

यापूर्वी २५ जुलै रोजी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्याला करोनाचा लागण झाल्याचे ट्विटवरुन सांगितलं होतं. “माझ्यात करोनाची लक्षणं दिसत होती. त्यामुळे मी करोना चाचणी केली. माझा अहवाल सकारात्मक आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची करोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावं”, असे आवाहन शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटवरुन केलं होतं. सध्या शिवराज सिंह चौहान यांच्यावरही उपचार सुरु आहेत.