केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह गुरुवारी बंगालच्या दौऱ्यावर असताना आदिवासी बहुल बांकुरा येथे भेट दिली. तसेच स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. मात्र, सुरुवातीला त्यांनी बिरसा मुंडा यांच्याऐवजी दुसऱ्याच प्रतिमेला अभिवादन केलं. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शाह यांच्या या चुकीबद्दल तृणमूल काँग्रेसने संताप व्यक्त करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना ‘बाहेरचे’ असं संबोधले.

शाह यांनी या कार्यक्रमाचे फोटो ट्वीट करुन लिहिले की, “आज पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे प्रसिद्ध आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण केली. बिरसा मुंडा यांचं जीवन आपल्या आदिवासी बहिण आणि भावांचे अधिकार आणि उत्कर्षासाठी समर्पित होता. त्यांच धाडस, संघर्ष आणि बलिदान आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहिल.”

दरम्यान, ही घटना ऐकल्यानंतर पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाही भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली. टीएमसीने ट्विट करीत शाह यांना परदेशी संबोधलं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या संस्कृतीपासून इतके अनभिज्ञ आहेत की त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना एका चुकीच्या प्रतिमेचा पुष्पहार घालून अपमानित केलं आहे. तसेच त्यांची प्रतिमा दुसऱ्या कोणाच्या पायाजवळ ठेवली. ते कधी बंगालचा सन्मान करु शकतील?”

दुसरीकडे या गडबडीवर आदिवासी संघटना ‘भारत जकात माझी परगना महल’ या संघटनेनेही राग व्यक्त केला आहे. संघटनेच्या नेत्यांनी म्हटलं की, “या घटनेमुळे आदिवासी समाजामध्ये स्वतःला फसवल्याची भावना आहे. या घटनेमुळे आम्ही व्यथित झालो आहोत.” यावेळी आदिवासी समाजातील लोकांनी या घटनेमुळे बिरसा मुंडा यांचा अपमान झाल्याचे म्हणत प्रतिमेजवळ गंगाजल शिंपडून त्याच कथीत शुद्धीकरण केलं.