जम्मू-काश्मीरमधील एक फुटबॉलपटू काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला होता. मागील आठवड्यामध्ये फेसबुकवर पोस्ट टाकून त्याने ही माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी आपला निर्णय बदल आणि घरी परत ये, अशी विनवणी केली होती. अखेर या मुलाने आपला निर्णय बदलत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

मागील आठवड्यात १० नोव्हेंबर रोजी अनंतनाग येथील मजीद अर्शिद खानने फेसबुकवरुन आपण लष्कर-ए-तोयबा संघटनेचे सदस्य होत असल्याचे जाहीर केले. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा एके-४७ बंदुक पकडलेला फोटो अपलोड केला होता. खान हा स्थानिक स्तरावरील लोकप्रिय फुटबॉलपटू असल्याने त्याच्या या पोस्टची आणि निर्णयाची चांगलीच चर्चा अनंतनागमध्ये रंगली होती. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार मजीद खानला पोलिसांनी अटक केली आहे. आम्हाला तो (मजीद खान) सापडला आहे. हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे. त्याच्या आईने केलेल्या प्रार्थनेचा हा परिणाम आहे. माजीदप्रमाणेच ज्यांनी देशाविरुद्ध हत्यारे उचलली आहेत त्यांनीही स्वत:च्या घरी परत यावे, असे आवाहन या अधिकाऱ्याने ट्विटद्वारे केले आहे.

मजीद लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झाला होता. अनंतनागमधील डिग्री कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असणारा मजीद त्या संघटनेच्या काही दहशतवाद्यांनाही ओळखतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मजीदच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये दक्षिण कश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मजीदचा जवळचा मित्र निसार ठार झाला होता. जवळच्या मित्राचा असा शेवट झाल्याने मजीदला मानसिक धक्का बसला होता. तेव्हापासून त्याच्या वागण्यात बदल झाला होता. त्याच्या वागण्यातील बदल जाणवून येत होता असेही मजीदच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.

ज्याप्रमाणे मजीदने फेसबुकवर दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची माहिती दिली त्याचप्रकारे त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी फेसबुकवर त्याला परत येण्यासाठी अनेकदा विनंती केली. मजीदने जेव्हा दहशवादी संघटनेमध्ये जाण्याचा निर्णय फेसबुकवर जाहीर केला तेव्हा त्याच्या पालकांबरोबरच जवळच्या मित्रांनाही धक्का बसला होता. माजीद हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा दहशतवादी संघटनेत शामिल होण्याचा हा निर्णय खूपच धक्कादायक होता, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. मजीदच्या आईचा मुलासाठी रडतानाचा व्हिडीओही अनंतनागमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये ती रडत रडतच मजीदला परत घरी येण्याचे आवाहन करताना दिसते. अखेर घरच्यांच्या आणि मित्रांच्या या प्रयत्नांना यश आल्यानेच मजीद परत येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.