संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीने हिंदी भाषेचा कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा म्हणून समावेश केला आहे. लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे.

अबुधाबीच्या न्याय विभागाने (एडीजेडी) शनिवारी म्हटले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये अरबी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचा समावेश करीत कोर्टासमोर येणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यासाठी भाषेच्या माध्यमाचा विस्तार केला आहे. हिंदी भाषिक लोकांना खटल्याची प्रक्रिया, त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबाबत माहिती मिळण्यास मदद व्हावी हा या मागचा हेतू आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या लोकसंख्येत सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या ही परदेशी प्रवाशी लोकांची संख्या आहे. इथे भारतीयांची लोकसंख्या २६ लाख आहे. ही लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे. अबुधाबीतील हा सर्वांत मोठा प्रवासी समाज आहे.

या नव्या निर्णयासोबतच हिंदी भाषिकांना अबुधाबीच्या न्यायिक विभागत अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अबुधाबीच्या न्यायिक विभागाचे अंडर सेक्रेटरी युसूफ सईद अल आबरी म्हणाले, आम्ही न्याय प्रक्रियेला अधिक पारदर्शी बनवू पाहत आहोत. त्यासाठी २०२१साठी नवी योजना आम्ही आखली आहे.