दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आपली उद्दीष्टे साध्य करण्यासाठी शिष्टाचाररहित पद्धत अवलंबली असल्याचे उद्योगपती विजय माल्ल्या म्हणाले. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्सवर एफआयआर दाखल करण्याचे केजरीवालांनी आदेश दिल्यानंतर विजय माल्ल्या यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
विजय माल्ल्या म्हणतात की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय पक्ष असे आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात करतात. माझ्या मते अरविंद केजरीवाल आपली उद्दीष्टे साध्य करण्यासाठी अपारंपारिक पद्धतीचा वापर करत आहेत. देशातील उद्योगांचा आदर केला गेला पाहिजे कारण, देशाच्या आर्थिक वाढीत उद्योगधंदे महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अशा उद्योगांशी आणि त्यांच्या संचालकांशी आदर आणि सन्मानाने वागले पाहिजे. असेही माल्ल्या म्हणाले. तसेच जर रिलायन्स कंपनी किंवा इतर कोणत्याही कंपनीने चुकीचा मार्ग अवलंबला असेल तर, त्यांच्यावर कारवाईसाठी कायद्याची प्रक्रिया आहे. मी कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा नाही असेही मल्ल्या म्हणाले.