अमेरिकेतील कोलोरॅडोमधील वॉलमार्ट दुकानात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वॉलमार्ट दुकानात गोळीबार सुरु असल्याची माहिती बुधवारी संध्याकाळी पोलिसांना मिळाली. यानंतर तातडीने थोनर्टन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत कारवाई सुरु केली. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. नागरिकांनी या परिसरापासून दूर रहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

थोनर्टन परिसरातील वॉलमार्ट दुकानात बुधवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास गोळीबार झाला. यावेळी लोक मोठ्या संख्येने दुकानात खरेदीसाठी आले होते. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनेकांची सुटका केली. मात्र अद्याप काही जण आत अडकले आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला आणि कोणत्या हेतूने केला, याबद्दलची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. सध्या वॉलमार्ट दुकानाला पोलिसांनी वेढा घातला आहे. हा हल्ला सराईत हल्लेखोराकडून झालेला नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित आहे. याशिवाय रुग्णवाहिकादेखील वॉलमार्ट दुकानाबाहेर आहेत. या हल्ल्यात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून तपास सुरु आहे,’ अशी त्रोटक माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधी मंगळवारी मॅनहॅटनमध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना घडली होती. यामध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ११ जण जखमी झाले होते. सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गिकेवर सेफुल्लो सायपोव्ह या दहशतवाद्याने ट्रक चालवत अनेकांना चिरडले होते. ‘सायपोव्ह २०१० मध्ये अमेरिकेत आला होता. यानंतर त्याने फ्लोरिडामधून वाहन चालवण्यासाठी आवश्यक परवाना मिळवला. तो न्यू जर्सीमध्ये वास्तव्यास होता,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या सायपोव्ह पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे. सायपोव्ह उबरचा चालक असल्याची माहिती समोर आली आहे.