उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्याच्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ, मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विनीत सरण यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. जोसेफ यांची पदोन्नती सरकारने त्यांचे नाव दोनदा न्यायवृंदास परत पाठवल्याने अडली होती. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या २५ झाली असून सहा जागा अजूनही रिकाम्या आहेत.

इंदिरा बॅनर्जी या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील आठव्या महिला न्यायाधीश आहेत. त्यांची नियुक्ती कोलकाता उच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी २००२ मध्ये झाली नंतर ८ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. ५ एप्रिल २०१७ रोजी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद देण्यात आले. न्या. सरण यांची १४ फेब्रुवारी २००२ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात नेमणूक झाली नंतर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाली होती. २६ फेब्रुवारी २०१६ रोजी ते ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. न्या. जोसेफ यांचे नाव न्यायवृंदाने १० जानेवारीला सुचवले होते. ३० एप्रिलला त्यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारने ते सेवाज्येष्ठतेत कमी असल्याचे कारण सांगून परत पाठवला. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे हरीश रावत सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय जोसेफ  यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना अवैध ठरवला होता. सरकारने त्यांच्या नावाची शिफारस फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने जुलैत त्यांच्या नावाचा प्रस्ताव परत सरकारकडे पाठवला होता.

मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुका

दिल्ली उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांची जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक क रण्यात आली आहे. त्या राज्यातील पहिल्या मुख्य महिला न्यायाधीश आहेत. सिंधू शर्मा या जम्मू काश्मीर उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. राजेंद्र मेनन हे पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते आता दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कल्पेश सत्येंद्र झवेरी यांना ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आलेले विनीत शरण यांची जागा ते घेतील. कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अनिरुद्ध बोस यांना  झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नेमण्याची शिफारस केली होती, ती त्यांना पुरेसा अनुभव नाही असे सांगून फेटाळण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विजया के. ताहिलरामाणी यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून बढती दिली आहे. त्या इंदिरा बॅनर्जी यांची जागा घेतील. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. के.शहा यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आहे, ते न्या. मेनन यांची जागा घेतील. न्या. हृषीकेश रॉय यांना  केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आहे.