पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस अभूतपूर्व गोंधळाचा ठरला. सत्ताधारी भाजप व विरोधी बाकांवरील काँग्रेस सदस्य फलक घेऊन परस्परविरोधी घोषणा देताना दिसले. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात अत्यंत अगतिकपणे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
ललित मोदी प्रकरणावरून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कामकाज सुरू झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणारी फलकं घेऊन महाजन यांच्या आसनासमोर काँग्रेस खासदार घोषणा देऊ लागले. ते पाहून भाजप खासदारांनीदेखील फलक झळकावून घोषणा देण्यास सुरुवात केली. सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हा फरकच जणू या वेळी नष्ट झाला होता.
परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची भाजप व काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू होती. ललित मोदींना मदत करणाऱ्या सुषमा स्वराज यांचा राजीनामा घ्या; असे पोस्टर्स झळकावून काँग्रेस सदस्य मोदी सरकार हाय-हाय अशा घोषणा देत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनीदेखील पोस्टर्स झळकावले. ज्यावर ‘उलटा चोर कोतवाल डाँटे-किसानों की जमीन दामाद को बाँटे’ असे लिहिले होते.
या गोंधळातच भाजपच्या प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काहीशा अस्वस्थ झालेल्या सोनिया यांनी सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना बोलण्याची सूचना केली. पण शेवटपर्यंत गोंधळामुळे ते बोलू शकले नाहीत.
जोशी यांना कोणत्या नियमांतर्गत बोलण्याची परवानगी दिली, असा संतप्त प्रश्न विचारून खा. गौरव गोगई यांनी थेट महाजन यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह लावले. भाजप खासदारांनी तर त्यानंतर महाजन यांच्या आसनाकडे जाण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव व चंद्रकांत खैरे तर ‘दामादविरोधी’ पोस्टर्स घेऊन घोषणा देऊ लागले. या प्रकाराने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नाराज झाले. त्यांनी वेलमध्ये घोषणा देणाऱ्या भाजप खासदारांना जागेवर जाण्याची सूचना केली.