आगामी लोकसभेसाठी भाजपकडून अमेठी मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आल्यानंतर स्मृती इराणी यांची ‘आम आदमी पक्षा’च्या कुमार विश्वास यांच्याकडून खिल्ली उडविण्यात आली. इराणी येवो, पाकिस्तानी येवो, इटालियन अथवा अमेरिकन उमेदवार येवो अमेठी मतदारसंघातील जनतेने आपला निर्णय अगोदरच ठरविलेला आहे. राहुल गांधी ‘पॉलिटिकल अॅक्टर’ असून अमेठीतील जनता अशा ‘अॅक्टर्स’ना कंटाळली आहे. स्मृती इराणींच्या रूपाने यामध्ये आणखी एका ‘अॅक्टर’ची भर पडली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना स्मृती इराणी यांनी कुमार विश्वास यांना अकारण महत्व दिले जात असल्याचे सांगितले. तसेच कुमार विश्वास यांच्याकडून मी काडीमात्र आदराचीसुद्धा अपेक्षा करत नाही, आणि एक स्त्री म्हणून तर निश्चितच नाही असे स्मृती इराणींनी सांगितले. स्त्रियांचा अनादर करणे हा कुमार विश्वास यांचा पूर्वातिहास असून प्रसारमाध्यमांसाठीसुद्धा हा चर्चेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमेठी मतदारसंघातील थेट लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असून काँग्रेसशी छुपी युती असणारा ‘आप’सारखा दुय्यम पक्ष आपल्या गणतीतसुद्धा नसल्याची टीका स्मृती इराणींनी केली. या वक्तव्यानंतर प्रतिक्रीया देताना स्मृती इराणींची तयारी नसताना त्यांना बळजबरीने अमेठी मतदारसंघातून उभे राहण्यास पक्षाकडून भाग पाडले गेले असल्याने आपण त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत असल्याचे कुमार विश्वास यांनी सांगितले.