भाजपा आणि नरेंद्र मोदींवर कडाडून टीका करणारे, ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या सभेत हजेरी लावणारे भाजपाचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत असे समजते आहे. गुरुवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. पाटणा साहिब जागेवर जेव्हा रविशंकर प्रसाद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सध्या ते याच मतदारसंघाचे खासदार आहेत.

२०१४ मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी याच मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकांमध्ये ते निवडून आले आणि खासदारही झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळ आणि भाजपा यांच्यावर त्यांनी सातत्याने टीका केली. या टीकेमुळे भाजपातले बंडखोर नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती. घडलंही तसंच ज्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला जय श्रीराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली आहे असं समजतं आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नोटाबंदीचा निर्णय असो, जीएसटी असो किंवा सीबीआय आणि आरबीआयशी संबंधित बाबी असोत शत्रुघ्न सिन्हा यांनी कायमच पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. काही दिवसांपूर्वीच एक शेर ट्विट करून आपण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे संकेतही सिन्हा यांनी दिले होते.

काय होता ट्विट करण्यात आलेला शेर?
मोहब्बत करनेवाले कम ना होंगे, तेरी महफिलमें लेकिन हम ना होंगे असा हा शेर होता. याचाच अर्थ सिन्हा यांनी भाजपातून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तसंच गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती करत आहेत. यावरूनच राजकीय वर्तुळात असे अंदाज बांधले गेले की शत्रुघ्न सिन्हा भाजपातून काँग्रेसमध्ये जातील आणि आता गुरुवारी याच निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.