भारतात करोना संकट अजूनही नियंत्रणात येत नसताना Mucormycosis अर्थात काळी बुरशीचं संकट समोर उभं ठाकलं आहे. देशभरात म्युकरमायकोसिसचे रुग्ण हळूहळू वाढू लागले असल्यामुळे केंद्र सरकारने नुकताच त्याचा समावेश साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील आरोग्य यंत्रणा म्युकरमायकोसिसच्या नियोजनबद्ध उपचारांसाठी सज्ज होत असतानाच आता पांढरी बुरशी अर्थात White Fungus हे नवंच आरोग्य प्रशासनाच्या समोर उभं राहण्याची शक्यता आहे. बिहारच्या पाटण्यामध्ये या आजाराचे रुग्ण आढळले असून पांढरी बुरशी ही काळ्या बुरशीपेक्षाही धोकादायक असू शकते, असं मत काही डॉक्टर व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकाच वेळी काळी बुरशी आणि पांढरी बुरशी या दोघांशीही दोन हात करण्याची वेळ आरोग्य यंत्रणांवर येऊ शकते.

नेमका काय आहे प्रकार?

पाटण्याच्या पारस हॉस्पिटलमधल्या पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ चिकित्सक डॉ. अरुणेश कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना Whit Fungus विषयी माहिती दिली आहे. “पांढरी बुरशी ही काळ्या बुरशीपेक्षाही अधिक धोकादायक आहे. काळ्या बुरशीप्रमाणेच कमी प्रतिकारशक्तीमुळेच पांढरी बुरशी देखील वाढू शकते. त्यासोबतच ही बुरशी आढळणाऱ्या पाणी किंवा तत्सम गोष्टींच्या संपर्कात व्यक्ती आल्यास तिला पांढऱ्या बुरशीची लागण होऊ शकते. त्यामुळे सॅनिटायझेशन आवश्यक आहे”, असं डॉ. अरुणेश कुमार यांनी सांगितलं आहे.

पांढऱ्या बुरशीची लक्षणं

“पांढऱ्या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांना कोविड-१९प्रमाणेच लक्षणं दिसतात. पण त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह येते. या इन्फेक्शनचा शोध सीटी स्कॅन किंवा एक्स-रेच्या माध्यमातून लागू शकतो. पण पांढरी बुरशी काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक असते कारण, काळ्या बुरशीची फक्त सायनस आणि फुफ्फुसांनाच लागण होते. पण पांढऱ्या बुरशीचा फैलाव किडनी, मेंदू, तोंड, पोट, त्वचा, नखं, गुप्तांगातही होऊ शकतो”, अशी माहिती डॉ. अरुणेश कुमार यांनी दिली आहे.

करोना रुग्णांना का आहे जास्त धोका?

दरम्यान, पांढऱ्या बुरशीची करोना रुग्णांना लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचं डॉ. कुमार यांनी सांगितलं. “मधुमेह, कर्करोग असणारे रुग्ण किंवा बऱ्याच काळापासून स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांनी पांढऱ्या बुरशीपासून सावध राहण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय, ऑक्सिजनवर असणाऱ्या करोना रुग्णांना देखील पांढऱ्या बुरशीचा धोका आहे”, असं त्यांनी म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद केलं आहे.

Mucormycosis : केंद्र सरकारनं म्युकरमायकोसिसचा केला साथरोग कायद्यात समावेश, नवी नियमावली लागू!

दरम्यान, काळी बुरशी देशाच्या विविध भागात रुग्णांमध्ये आढळून येत असली, तरी पांढऱ्या बुरशीचा बिहारच्या बाहेर प्रसार झाल्याची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच, केंद्र सरकार किंवा बिहार राज्य सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.