ब्रेकअप झाल्यानंतर बंगळुरुमधील स्टार्ट अप कंपनीच्या सीईओने एका मुलीचे जगणे मुश्किल केल्याची घटना समोर आली आहे. प्रियकराकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला. राहुल सिंह (२८) असे आरोपीचे नाव आहे. राहुल दिवसभर या मुलीवर पाळत ठेवायचा. तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे बारीक लक्ष असायचे.

पीडित तरुणीने एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनमध्ये राहुल सिंह विरोधात तक्रार नोंदवली. या दोघांचे वर्षभर प्रेमसंबंध होते. या काळात राहुलने तिला प्रचंड त्रास दिला म्हणून तरुणीने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी आपआपले मार्ग वेगळे केले. पण त्यानंतरही राहुल या मुलीला त्रास देत होता.

राहुल दिवसभर या तरुणीच्या घराबाहेर थांबून असायचा. वेगवेगळे फोन नंबर आणि मेल आयडी वापरुन दिवसभर तिच्यावर पाळत ठेवायचा. तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे हे पूर्वप्रेयसीला समजले पाहिजे हा त्यामागे हेतू होता. राहुलचे वडिल अधिकारी पदावर आहेत. मी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर त्यांनी माझ्या आईला फोन केला व मी तक्रार मागे घ्यावी यासाठी दबाव टाकला.

तुमच्या मुलीने राहुल विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तिला जीवानिशी संपवू अशी धमकी त्यांनी माझ्या आईला दिली असे पीडित तरुणीने सांगितले. राहुलने या तरुणीच्या घरात घुसून तिचा फोन चोरला व तिचे सोशल मीडियावरील अकाऊंटस हॅक केले. त्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

राहुल आता फरार असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. पोलिसांनी राहुलला समज दिल्यानंतर परिस्थिती आणखीनच खराब झाली. राहुल शिवराळ भाषेतले मेसेज पाठवायचा. मी कुठे आहे त्याची माहिती मिळवण्यासाठी इमारतीच्या सुरक्षारक्षकालाही त्याने लाच दिली असे पीडित तरुणीने सांगितले.

१८ सप्टेंबरला राहुलने माझ्या ऑफिसपासून घरापर्यंत माझा पाठलाग केला. त्यावेळी त्याच्या हातात चाकू होता असा माझा अंदाज आहे. मला माझ्या जीवाची भिती वाटली असे तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने त्यानंतर लगेच पोलिसात धाव घेतली. तरुणीच्या घराजवळ आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपीला तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.