सार्क परिषदेच्या उदघाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवादी कारवायांवरून ठणकावले होते. मात्र गुरुवारी परिषदेचा समारोप होत असताना मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी हस्तांदोलन केले, तसेच थोडा संवाद साधला. त्यामुळे परिषदेच्या उद्घाटनावेळी असलेला तणाव समारोपावेळी काहीसा निवळला.
उद्घाटनावेळी मोदींनी शरीफ यांचा उल्लेख केला नव्हता. त्या पाश्र्वभूमीवर या दोघांच्या हस्तांदोलनाला नेपाळचे पंतप्रधान व परिषदेचे आयोजक सुशील कोईराला यांनी विशेष दाद दिली. या परिषदेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी किमान दोघे एकत्र तरी आले असा सूर इतर सार्क देशांच्या सदस्यांचा होता.  या छायाचित्राची सर्व जण वाट पाहत होते अशा शब्दांत यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अक्रबुद्दीन यांनी ट्विट केले. परिषदेच्या समारोपाच्या दिवशी गुरुवारी दोन वेळा हे दोन्ही नेते आमने-सामने आले होते. याआधी ‘सार्क’च्या परंपरेनुसार परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जवळच एखाद्या ठिकाणी एखादे हॉटेल किंवा रिझॉर्टमध्ये अशी अनौपचारिक भेट होते. यावेळी धुलिखेत येथे ही भेट होती. मर्यादित व्यक्ती असल्याने येथे मोदी-शरीफ समोरासमोर येणे अपरिहार्य होते. त्यामुळे दोघांची केवळ नजरानजर झाली मात्र कोणतीही चर्चा झाली नाही.  बुधवारी उद्घाटनावेळी व्यासपीठावर असतानादेखील मोदी व शरीफ यांनी संवाद साधला नव्हता. मोदी यांनी शरीफ यांच्याखेरीज सार्क सदस्य देशांच्या प्रमुखांची द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत चर्चाही केली होती. सार्क परिषदेच्या उद्घाटनापासूनच मोदींनी शरीफ यांच्या उपस्थितीची विशेष दखल घेतली नव्हती.