करोनामधून थोडंफार सावरत असणाऱ्या जगभरातील देशांना मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी येणाऱ्या दोन धोक्यासंदर्भात इशारा दिलाय. बिल गेट्स यांनी भविष्यामध्ये वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद (Climate Change and Bio-terrorism) या दोन गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल अशी भीती व्यक्त केलीय. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी हा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांपूर्वी बिल गेट्स यांनी करोनासारख्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची भविष्यवाणी केली होती. भविष्यात पृथ्वीवर अशा विषाणूचा प्रादुर्भाव होईल की ज्यामुळे लोकं बाजारात जायलाही घाबरतील, अशा शब्दांमध्ये गेट्स यांनी साथीच्या रोगासंदर्भात इशारा दिला होता. गेट्स यांनी लोकांना विमान प्रवास करण्यातही अडथळा येईल आणि लोकं विमानप्रवासालाही घाबरतील अशी परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिलेला. त्यामुळेच आता गेट्स यांनी पुन्हा नव्याने इशारा दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

डेरेक मुलर या युट्यूबरच्या व्हेरिटासीयम या चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांनी वातावरण बदल आणि जैविक दहशतवाद या दोन मोठ्या धोक्यांविरोधात मानव तयार नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. “पुढील येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा वातावरण बदलामुळे घोषणा घटनांमुळे अनेकांचा मृत्यू होईल. तसेच जैविक दहशतवादाचा धोकाही जगावर आहे. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कोणीही नवीन विषाणूची निर्मिती करु शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणाऱ्या करोना विषाणूपेक्षा या दोन गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाहाकार उडेल,” अशा शब्दांमध्ये बिल गेट्स यांनी इशारा दिलाय.

कोणत्याही साथीच्या रोगाला जगभरामध्ये पसरवण्यापासून थांबवता येणार नाही. आपण फक्त अशा संकटांचा समाना करण्यासाठी आधीपासून तयार राहणं हा एकमेव मार्ग आहे, असं मत बिल गेट्स यांनी व्यक्त केलं आहे. श्वसनाशी संबंधित विषाणू हे खूप धोकादायक असतात. असे विषाणू काही ठराविक काळानंतर प्रादुर्भाव होऊन पसरत असतात. अनेकदा यापैकी अनेक विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतरही काही विशेष फरक दिसून न आल्याने त्याबद्दल समजत नाही. मात्र त्याचवेळी इबोलासारख्या आजारामध्ये व्यक्तीला थेट रुग्णालयात दाखल करावं लागतं, असंही बिल गेट्स या मुलाखतीमध्ये म्हणाले.