काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चर्चेनंतर  घेण्यात आला. करोनास्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यात नव्या अध्यक्षाची निवड होईल. मात्र या बैठकीमधील सर्व ठरावांना पक्षनेतृत्वाला पत्र पाठविणारे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, , आनंद शर्मा, जितेंद्र प्रसाद, मुकूल वासनिक यांनीही पाठिंबा दिला. मात्र या बैठकीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचेही दिसून आले. सोमवारी (२४ ऑगस्ट २०२०) रोजी झालेल्या या बैठकीमध्ये या चारही नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असं वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आलं. हे चारही नेते काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्य असून काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांपैकी आहेत. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीनंतर नेतृत्वबदलासंदर्भातील पत्रावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि शशि थरुर यांच्याबरोबर काँग्रेसच्या ९ वरिष्ठ नेत्यांनी गुलाम नबी आजाद यांच्या घरी रात्री बैठक घेतली.

आणखी वाचा- ‘या’ काँग्रेस नेत्याच्या घरी डिनरदरम्यान झाली हायकमांडला पत्र पाठवण्याची प्लॅनिंग

शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार पत्रावर सही करणारे मात्र कार्यसमितीचे सदस्य नसणारे काही नेते बैठकीमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठीच ही बैठक घेण्यात आली होती. बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयावर सर्वजण समाधानी आहेत, असंही शर्मा यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये सर्वांना बोलण्याची संधी मिळाली आणि स्पष्टपणे चर्चा झाल्याचेही शर्मा यांनी म्हटलं आहे. मात्र या २३ नेत्यांनी पाठवलेलं पत्र बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या सदस्यांना दाखवण्यात आलेलं नाही. “या पत्रासंदर्भात अनेक गैरसमज होते, अनेक शब्द चुकीच्या अर्थाने घेण्यात आले, ज्यामुळे आमच्याविरोधात काही वक्तव्य करण्यात आली. यावेळी मी पत्र सर्वांसाठी सार्वजनिक करावे अशी मागणी मी केली. हे पत्र जनतेच्या समोरही आलं पाहिजे ज्यामुळे नक्की कशामुळे ही चर्चा होत आहे हे त्यांनाही कळू शकले,” असं शर्मा यांनी सांगितलं.

आणखी वाचा- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीचा संदर्भ देत शर्मा यांनी बैठकीत काय घडलं याबद्दलही माहिती दिली. “आजाद, वासनिक आणि मी बैठकीमध्ये स्वत:चे मुद्दे मांडले. यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि या विषयावर एकमत करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी होकार दिला. जे काही झालं ते जाऊ द्या आणि एकत्र येऊन पुढे जाऊयात असं अध्यक्षा म्हणाल्या,” असं शर्मा यांनी स्पष्ट केलं. पत्रामधील काही मजकूर उघड झाल्याने दु:ख झालं असलं तरी तुम्ही सर्वजण माझे सहकारी आहात. आम्ही त्यांच्या (शर्मा यांच्या) मताचा आदर करतो आणि त्यांच्या वक्तव्यामुळे एकजूट वाढण्यास मदत होईल, असं अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्याचे शर्मा यांनी सांगितलं.

आणखी वाचा- कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांचं पुन्हा एकदा मोठं वक्तव्य; म्हणाले…

पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अन्य एका नेत्याने, “आपल्या सर्वांना या प्रकरणावर काय निर्णय घेतला जाईल हे जाणून घेण्यासाठी वाट पहावी लागणार आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. नेतृत्वासंदर्भात विचार विनिमय करण्यात यावा असं पत्र पाठवणाऱ्या नेत्यांनी आपला सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना विरोध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. पाच पानांच्या या पत्रामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल काहीच वक्तव्य करण्यात आलेलं नाही असं सांगितलं जात आहे.