News Flash

‘तौते’ शांत झालं, आता ‘यास’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार! भारतीय हवामान विभागाचा इशारा!

तौते चक्रीवादळानं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर थैमान घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर 'यास' चक्रीवादळाची टांगती तलवार आहे!

संग्रहीत छायाचित्र

अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तौते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात धडकलं. या प्रवासादरम्यान, तौते चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि अंतिमत: गुजरात या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातलं. किनारपट्टीच्या भागातली वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा या वादळामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला. अखेर मंगळवारी दुपारी या वादळाचा गुजरातच्या किनारपट्टीवर लँडफॉल झाला आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी झाली. पण तौते वादळाची तीव्रता कमी होते न होते तोवर आता यास चक्रीवादळाची टांगती तलवार किनारी भागावर निर्माण झाली आहे. समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जर अधिक तीव्र झाला आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर ते ‘यास’ म्हणून ओळखलं जाईल. वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा!

बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२१ मेपासून सागरी परिस्थिती धोकादायक!

दरम्यान, २१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

‘तौते’ नाव म्यानमारने दिलं, तर ‘यास’ हे नाव…

भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं ‘तौते’ हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. प्रचंड आवाज करणाऱ्या सरड्याची प्रजाती GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला ‘यास’ असं नाव दिलं जाईल. ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.

गेल्या वर्षी देखील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अम्फान’ या चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा बसला होता. यामध्ये कोलकाता, २४ उत्तर परगणा, दक्षिण परगणा या भागामध्ये या वादळाचा तडाखा बसला. तिथून पुढे हे वादळ बांग्लादेशच्या दिशेनं वळलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 9:09 pm

Web Title: after cyclone tauktae imd forecast yaas cyclone over bay on bengal andaman pmw 88
Next Stories
1 “केंद्राला त्यांच्या प्रतिमेची काळजी आहे, पण आम्हाला आमच्या मुलांची चिंता आहे!”
2 नागरिकांच्या मानसिकतेसाठी इम्फालमध्ये आता ना अँब्युलन्सचा सायरन वाजणार, ना लाऊडस्पीकर
3 कर्नाटक: विनामास्क फिरणाऱ्या डॉक्टराचा मॉलमध्ये गोंधळ; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X