घरकामाचा पगार मागितला म्हणून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले. दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मनजीत कारकेताला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांच्या मदतीने आपण मुलीची हत्या केल्याचे त्याने सांगितले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

चार मे रोजी दिल्लीतील एका नाल्यात मुलीच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. मनजीत या मुलीला झारखंडहून घेऊन आल्यानंतर तिला दिल्लीत घरकामाला लावले होते. नाल्यामध्ये मुलीच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मियानवाली नगरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या परिसरात जवळपास २०० कुटुंब राहतात.

मुलीच्या हत्येनंतर मियानवाली नगरमध्ये राहणारा झारखंडमधला एका रहिवाशी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयिताच्या गावच्या घरावर धाड टाकली तेव्हा तो तिथे सापडला नाही. त्यानंतर १७ मे ला संशयित आरोपी दिल्लीतील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचला व आरोपी मनजीत कारकेताला अटक केली.

चौकशीमध्ये मनजीतने झारखंडमधील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून आपण दिल्लीला आणत असल्याची कबुली दिली. मृत मुलगी तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आली होती. तिला एका कुटुंबात घरगुती कामासाठी ठेवले होते. आरोपी दर महिन्याला या मुलीच्यावतीने तिचे वेतन घ्यायचा पण तिला एक पैसाही देत नव्हता असे पोलीस तपासातून समोर आले.