पाच हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात माजी बँक संचालकाविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच सोमवारी आंध्रा बँकेच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांची घसरण झाली. आंध्रा बँकेच्या शेअरमध्ये ३३.६० रुपयापर्यंत घसरण झाली. बँकेच्या शेअरने ५२ आठवडयातील नीचांकी पातळी गाठली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ शर्मा यांच्या न्यायालयात अनुप प्रकाश गर्ग यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यातील विविध कलमातंर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

ईडीने विशेष वकिल नितेश राणा यांच्यामार्फत हे आरोपपत्र दाखल केले. २०११ मध्ये आयकर खात्याने एक डायरी जप्त केली होती. त्या डायरीमध्ये स्टर्लिंग बायोटेकचे संचालक चेतन जयंतीलाल सांदेसारा आणि नितीन जयंतीलाल सांदेसरा यांनी आंध्रा बँकेचे संचालक गर्ग यांना १.५२ कोटी रुपये दिल्याचा उल्लेख होता.

२००८ आणि २००९ मधील हे व्यवहार होते. अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी अनुप प्रकाश गर्ग (५९) यांना जानेवारीमध्ये अटक केली. २००८-०९मध्ये गर्ग यांनी नऊवेळा पैसे स्वीकारल्याचा उल्लेख आहे. ही रक्कम १ कोटी ५२ लाखाच्या घरात आहे. स्टर्लिंग बायोटेकच्या वेगवेगळया खात्यांतून ही रक्कम काढण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयने स्टर्लिंग बायोटेकच्या संचालकांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. गर्ग यांना ईडीने १२ जानेवारीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.