लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल रविवारी जाहीर झाल्यानंतर, अपेक्षेनुसार सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उसळी मारल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये दुपारपर्यंत १,३५६ अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकातही ४०० अंकांची वाढ झाल्याचे दिसून आले. शिवाय रूपया देखील डॉलरच्या तुलनेत ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स ८८८.९१ अंकांच्या वाढीसह ३८,८१९.६८ अंकांवर तर निफ्टी २८४.१५ अंकांच्या वाढीसह ११,६९१.३० अंकांवर उघडला. रविवारी लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा पार पडल्यानंतर विविध माध्यमांनी दर्शवलेल्या एक्झिट पोल प्रमाणे केंद्रातील सत्ता पुन्हा ‘एनडीए’ कडे जाणार असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम आज शेअर बाजारावरही दिसून आला. दुपारच्या सुमारास सेन्सेक्समध्ये झालेली १,३५६ अंकांची तर निफ्टीत झालेली ४०० अंकांची वाढ दहा वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. सेन्केक्स ३९,३०० तर निफ्टी हा निर्देशांक ११,८०० च्या जवळपास होता.

तज्ज्ञांचे असे मत आहे की, केंद्रात स्थिर सरकार येण्याची चिन्हे दिसता असल्याचे पाहून, शेअर बाजार याचा आनंद साजरा करेल. आज स्टेट बँक, येस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक आदींचे शेअर वधारले आहेत. काही बँकांचे शेअर तर तब्बल सहा टक्क्यांनी वधारून विक्रमी पातळीवर पोचले आहेत. अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा स्थापन होईल या एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजारात उत्साहाचे लातावरण बघायला मिळत आहे.