लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपने तिसरा मोठा करार केला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि सिल्वर लेक या कंपन्यांनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता अमेरिकेची अजून एक मोठी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेची खासगी इक्विटी फर्म ‘व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स’ (Vista Equity Partners) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये  11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अमेरिकेची व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणूकीद्वारे व्हिस्टा कंपनी जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सकडून आज(दि.8) याबाबत माहिती देण्यात आली.  या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे. “जिओ भारतात डिजिटल प्लॅटफॉर्मचं मोठं काम करत आहे. भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जिओ प्लॅटफॉर्म्ससोबत काम करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत” अशी प्रतिक्रिया व्हिस्टाचे चेअरमन आणि सीईओ रॉबर्ट एफ स्मिथ यांनी दिली.

या करारामुळे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच फेसबुकने  9.99 टक्के भागभांडवल खरेदी करताना जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सिल्वर लेक कंपनीने केवळ एक टक्के हिस्सेदारीसाठी जिओमध्ये तब्बल 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, आणि आता अजून एका अमेरिकी कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केलीये. तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा जिओ प्लॅटफॉर्मचा तिसरा मोठा करार आहे.