केरळमध्ये पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता पुनर्निर्माण आणि पुनर्वसनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक भागात स्वच्छता करणारे, इलेक्ट्रीशिअन आणि प्लंबरला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे पुनर्निर्माणाचे कार्य खर्चिक बनले आहे. बहुतांश विहिरी या चिखल आणि कचऱ्याने भरलेल्या आहेत. प्रत्येक विहिर स्वच्छ करण्यासाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च आहे. कुनामथाई येथे राहणारे पी.के.कुत्तन हे दरवर्षी उन्हाळयात जवळपास ४० विहिरी स्वच्छ करतात.

आता पूराचे पाणी ओसरल्यानंतर विहिरी स्वच्छ करुन देण्यासाठी आपला फोन सतत खणखणत आहे असे कुत्तन यांनी सांगितले. फारशा खोल नसलेल्या छोटया विहिरी स्वच्छ करण्याचा खर्च दोन हजार रुपये आहे. मोठया विहिरी स्वच्छ करताना धोकाही तितकाच असतो त्यामुळे किंमत वाढते असे कुत्तन यांनी सांगितले.

इलेक्ट्रीशिअनला सुद्धा केरळमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे. तीन बेडरुमच्या घरांमध्ये वायरींग करण्याचा खर्च २० हजार रुपये आहे असे उदयमपीरुर येथे राहणारे इलेक्ट्रीशिअन सानोज जोसेफ यांनी सांगितले. केरळमधल्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी साचले होते. बचावपथकांना घरांमध्ये पोहून प्राण वाचवावे लागले होते.

पुरात अनेक घरांमध्ये वायरींगचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा नव्याने वायरींग करण्यासाठी आम्ही हलक्या प्रतीचे सामान वापरत आहोत. जेणेकरुन खर्च कमी होईल. घर मालकाला चांगल्या प्रतीच्या ब्राण्डेड वस्तू हव्या असतील तर जास्त पैसे मोजावे लागतील असे जोसेफने सांगितले. प्रसंग कठिण असला तरी आम्ही पूर्णपणे मोफत काम करु शकत नाहीत. शेवटी आमच्यावर आमचे कुटुंब अवलंबून आहे. एका घरात वायरींगचे संपूर्ण काम करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. अनेक संस्थांनी काही घरगुती सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी पुरग्रस्तांसाठी केली २१ हजारांची मदत
निसर्गसौंदर्यानं नटलेल्या देवभूमीवर वरुणराजाची अवकृपा झाली आहे. निसर्गाच्या कोपामुळे अर्ध केरळ पाण्याखाली गेलं आहे. हजारो लोक बेघर झालेत तर लाखो मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. गेल्या दोन आठवड्यात तीनशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. देशभरातूनच नाही तर जगभरातून मदतीचे हात केरळवासीयांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनीदेखील केरळवासीयांसाठी शक्य तितकी आर्थिक मदत जमा केली आहे.

समाजाच्या दृष्टीनं नेहमीच उपेक्षित असलेल्या या महिलांना जेव्हा केरळमधल्या भीषणतेची कल्पना आली तेव्हा माणुसकीच्या नात्यानं या महिलांनी जमेल तितका निधी गोळा करत मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे. समाजानं आपल्याला नाकारलं असलं तरी या समाजाप्रती आपलं काहीना काही कर्तव्य नक्कीच असतं याची जाण ठेवत अहमदनगर येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी २१ हजारांचा निधी पंतप्रधान मदत निधीसाठी दिला आहे.