गेल्या अनेक सार्वत्रिक निवडणुकांत ‘भावी पंतप्रधान’ म्हणून भारतीय जनता पक्षाने ज्यांचे नाव पुढे रेटले होते त्या लालकृष्ण अडवाणी यांच्या मोदीविरोधाने पुन्हा एकवार उचल खाल्ली असून नरेंद्र मोदी यांना भावी पंतप्रधान म्हणून पुढे करण्यास त्यांचा तीव्र विरोध शमवण्यासाठी भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी शिष्टाईसाठी शर्थ सुरू केली आहे.
मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येताच जाहीर पत्र लिहून अडवाणी यांनी ज्यांनी जीव ओतून पक्ष वाढवला त्यांच्या विचाराला मूठमाती देऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याची टीका केली होती. आता तोच जप अडवाणी पुन्हा करीत असून संघ व भाजपच्या नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या उमेदवारीला संमती मिळवण्यासाठी राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. अडवाणी यांनी मात्र मोदींच्या नावाबाबत कोणतेही आश्वासन त्यांना दिले नाही. अडवाणी यांच्या निवासस्थानी राजनाथ सिंह यांनी चर्चा केली. ही बैठक अर्धा तास चालली. मोदींच्या नावाला पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. संघाचे दूत म्हणून भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही बुधवारी अडवाणींशी चर्चा केली होती. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक १७ सप्टेंबरपूर्वी निश्चित करावी त्याच्या तारखेबाबतही अडवाणींची संमती मिळवण्याचा गडकरींचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे मोदी समर्थकांनी त्यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी १७ सप्टेंबरपूर्वी म्हणजे त्यांच्या वाढदिवसाआधी जाहीर करावी यासाठी आटापिटा चालवला आहे. अडवाणी यांच्यासह सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदींचे नाव जाहीर करू नये अशी भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली आणि मिझोराममध्ये येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे.
गेल्या महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही स्वतंत्रपणे अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची भेट घेऊन मोदींच्या नावावर मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर अडवाणींचे मतपरिवर्तन झाले काय हे स्पष्ट झालेले नाही. मोदींचे नाव जाहीर करण्यात विलंब झाल्यास ते पक्षासाठी योग्य ठरणार नाही, असे अनेक वरिष्ठ भाजप आणि संघ नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच अडवाणी, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नेतृत्वाचीच निवडणूक!
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीप्रमाणे सर्वोच्च नेत्याचीच निवड जनता येत्या लोकसभा निवडणुकीत करणार आहे. केंद्र सरकार नेतृत्वहीन झाले आहे आणि सत्ता राबविण्याचा अनुभव असलेल्या सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाकडून जेव्हा एखादा बलाढय़ नेता पुढे आणला जातो तेव्हा ती अध्यक्षीय निवडणुकीसारखी अटीतटीचीच होते
– अरुण जेटली

मोदींची बाराखडी ‘एफ’पासून
मोदी राजकारणातील एबीसीडी शिकत आहेत काय माहीत नाही. त्यांची बाराखडी मात्र ‘एफ’ म्हणजे फेक एन्काऊंटर्स अर्थात बोगस चकमकीपासून सुरू होते आणि ‘जी’ म्हणजे जीनोसाइड अर्थात छळछावणीपर्यंत येऊन संपते.
– मनिष तिवारी