नऊ गोळया अंगावर झेलल्यानंतरही दहशतवाद्यांना पुरुन उरलेले सीआरपीएफचे शूर अधिकारी चेतन कुमार चीता वर्षभराने पुन्हा देशसेवेत रुजू झाले आहेत. मागच्या आठवडयात दिल्लीत सीआरपीएफच्या मुख्यालयात त्यांनी कमांडट म्हणून जबाबदारी स्वीकाली. मी डयुटीवर परततोय त्याचा मला अभिमान आहे. कामावर परतताना आनंद होत आहे असे चीता म्हणाले. चीता यांचा प्रवास खरोखर थक्क करुन सोडणार आहे. चीता यांनी फक्त मृत्यूवरच मात केली नाही तर त्यांनी इतरांच्या मनात जिद्द, आत्मविश्वास, प्रेरणा निर्माण केली.

चीता यांचे बचावणे चमत्कारापेक्षा कमी नाही. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा भागात पहाटेच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी चेतन कुमार चीता यांना नऊ गोळया लागल्या होत्या. भारतीय लष्कराचे जवान शोध मोहिम राबवत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यावेळी सीआरपीएफच्या ४५ व्या बटालियनचे चीता कमांडट होते. समोरुन गोळीबार सुरु होता. त्याही परिस्थितीत चीता यांनी दहशतवाद्यांना रोखून धरले.

या पराक्रमासाठी चीता यांना किर्ती चक्र या दुसऱ्या क्रमांकाच्या शौर्य पुरस्कारने गौरवण्यात आले होते. तरुणांनी १०० टक्के देशासाठी योगदान दिले पाहिजे. मी तेच केले. मी त्यावेळी निसटू शकत होतो. पण मी गोळयांचा सामना केला असे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या या चकमकीत चीता यांनी त्यांचा एक डोळा गमावला. आजही त्यांच्या हातावर गोळयांच्या जखमा दिसतील. इतके सर्व घडूनही चीता हिम्मत हरले नाहीत त्यामुळे आज ते डयुटीवर परतू शकले.