काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिकेनंही भारताच्या या निर्णयाचं समर्थनही केलं होतं. तसंच त्यांनीदेखील असं पाऊल उचलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनंतर आता जपानदेखील टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.

जपानमध्ये चीन पब्लिशर्सकडून तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा लोकप्रतिनिधींचा विचार सुरू असल्याची माहिती एनएचके वर्ल्डनं आपल्या अहवालात दिली आहे. तसंच भारत आणि अमेरिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी सुरक्षेबाबत चितांही व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त युझर्सचा सर्व स्थानिक डेटाही अशा अ‍ॅपद्वारे चीनच्या सरकारच्या हाती लागू शकतो असंही त्यांचं म्हणणं असल्याचं एनएचकेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

जपानमध्ये क्रेझ

सप्टेंबर महिन्यापर्यंत हा प्रस्ताव सरकारसमोर सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जपानमध्ये टिकटॉकची मोठी क्रेझ आहे. सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅपच्या यादीत टिकटॉक हे पाचव्या क्रमांकावर आहे. भारतातदेखील टिकटॉक हे अ‍ॅप अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं.


टिकटॉककडून स्पष्टीकरण

“टिकटॉकबाबत या ठिकाणी अनेक अफवा आणि चुकीची माहिती देण्यात आली आहे. टिकटॉकमध्ये अमेरिकन सीईओ आणि इंडस्ट्री, अमेरिकन लष्कर आणि लॉ-इन्फोर्समेंट डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेले चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर्स आहेत. अमेरिकेची टीम आमच्यासाठी सर्वात सक्षम अशा सुरक्षेच्या सुविधा निर्माण करण्यास काम करत आहे,” अशी माहिती टिकटॉकच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. युझर्सचा सर्व डेटा अमेरिका आणि सिंगापूरमधील सर्वरमध्ये सेव्ह करण्यात येतो त्यामुळे तो सोप्या पद्धतीनं अॅक्सेस करता येत नसल्याचंही टिकटॉककडून सांगण्यात आलं.