काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर आणखी एका नेत्याने पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला काही सल्ले दिले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोळे उघडे ठेवून वास्तवाकडे बघितले पाहिजे. लोकसभेत आपल्या पक्षाचे केवळ ४४ खासदार आहेत आणि पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत, असे त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

यापूर्वी जयराम रमेश यांनी पक्षाच्या भवितव्याविषयी परखड भूमिका मांडत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसपुढे सध्या अस्तित्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. काँग्रेसची सध्याची दयनीय स्थिती हाताळण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या कार्यपध्दतीबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मी असं म्हणेन की, काँग्रेससमोर अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. ही निवडणुकीपुरती मर्यादित समस्या नाही. त्यामुळे पक्ष गंभीर संकटात सापडला आहे, असे रमेश यांनी म्हटले होते. सुलतानशाही गेली तरी आपले लोक अजूनही सुलतानाप्रमाणेच असल्यासारखे वागत असल्याचे सांगत रमेश यांनी काँग्रेसला चिमटा काढला होता. मणिशंकर अय्यर यांनी जयराम रमेश यांच्या भूमिकेला थेटपणे पाठिंबा दिला नसला तरी पक्षाच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे. काँग्रेसने त्यांच्या हेतूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काँग्रेस पक्षाला नव्या विचारांची, नव्या कार्यपद्धतीची आणि नव्या मार्गाची गरज असल्याचे अय्यर यांनी सांगितले.