गेल्या वर्षी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं. यानंतरही सुरक्षेच्या स्थितीत सुधारणा होत नसल्याचं दिसून आलं आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक तरूणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा गृहमंत्रालयासाठी चिंतेचा विषय बनला आहे. एनडीटीव्ही इंडियाशी बोलताना गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली.

या वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये ९० स्थानिक निरनिराळ्या दहशतवादी संघटनांमध्ये सामिल झाल्याचं गृहमंत्रालयाच्या माहितीवरून दिसून येत आहे. त्यापैकी ४५ हिजबुल मुजाहिद्दीन, २० लष्कर-ए-तोयबा. १४ जैश-ए-मोहम्मद, ७ अल बद्र, दोन अंसार गजवत उल हिंद आणि एक आयएसजेकेमध्ये सामिल झाल्याची माहिती यातून समोर आली आहे.

“ही संख्या अधिकही असू शकते याबाबत मोठी चिंता आहे. यापूर्वी सुरक्षा दलांना कुटुंब किंवा शेजारी राहत असलेल्यांकडून एवढंच काय तर सोशल मीडिया पोस्टद्वारेही तरूण बेपत्ता झाला असून दहशतावादी संघटनेत सामिल झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता ना कोणी सोशल मीडियाद्वारे याची माहिती देतं, ना कोणतंही कुटुंब समोर येतं,” अशी माहिती अधिकाऱ्यानं एनडीटीव्ही इंडियाशी बोलताना दिली. दहशतवाद्यांबरोबर होत असलेल्या चकमकीनंतर त्यांची माहिती समोर येते आणि त्यापैकी बहुतांशं स्थानिक तरूण असल्याचं समजतं. गेल्या काही दिवसांत चकमकींमध्ये ठार झालेल्यांपैकी ९० टक्के दहशतवादी हे काश्मीरमधील स्थानिकच होते.

“यावर्षी पहिल्या सात महिन्यांमध्ये काश्मीर खोऱ्यात ठार करण्यात आलेल्या १३६ दहशतवाद्यांपैकी १२१ स्थानिक होते आणि केवळ १५ दहशतवाही हे बाहेरील होते. तर २०१९ मध्ये ठार करण्यात आलेल्या १५२ पैकी ११९ स्थानिक होते. कितीही दहशतवाद्यांना ठार केलं तरी त्यांची संख्या कमी होत नाही,” असं एका नॉर्थ ब्लॉकच्या अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं.

दक्षिण काश्मीरच्या कुलमाममध्ये २४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. परंतु २३ स्थानिक तरूण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते. १० ऑगस्ट रोजी दहशतवादी संघटनेत सामिल झालेला एक तरुण १९ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. “९० स्थानिकांपैकी जे जून आणि ऑगस्टदरम्यान दहशतवादी संघटनांमध्ये सामिल झाले होते त्यांच्यापैकी ३८ जणांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर १५ जणांना अटक करण्यात यश मिळालं आहे,” अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.

लॉकडाउनमुळे परिणाम

गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की २१६ स्थानिकांना दहशतवाद्यांना आश्रय देण्यास किंवा त्यांना मदत करण्यासाठीही अटक केली गेली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळेही तरूण अधिक प्रमाणात याकडे वळत आहे. करोनामुळे तरूणांचं कामकाज बंद झालं आहे. शाळा, महाविद्यालयंही बंद आहेत. तर दुसरीकडे रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात निर्माण होत असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

काश्मीर एकतर ‘बंद’ मुळे बंद आहे आणि आता लॉकडाउनमुळे. तरूणांना नव्या संधी कुठे मिळतील? नव्या डोमिसाईल धोरणाचा त्यांच्यावर परिणामही होत आहे, असंही एका आयबीच्या अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं.