आपुले मरण पाहिले म्या डोळा असा वाक्प्रचार मराठीत प्रचलित आहे. मात्र गुजरातच्या सुरतमध्ये तक्षशिला शॉपिंग कॉम्प्लेक्सला जी आग लागली त्यातून वाचण्यासाठी ज्यांनी उड्या मारल्या त्यांनी हे अनुभवलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुरतमधल्या तक्षशिला शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागली. या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. याच इमारतीत एक कोचिंग क्लास आहे. या क्लासमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होती. जेव्हा आग लागली तेव्हा अनेक मुलांनी, लोकांनी उड्या मारण्यास सुरूवात केली. यावेळी एका मुलीने सांगितलेला अनुभव थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे.

जे काही शुक्रवारी आम्ही अनुभवलं त्या सगळ्या नरकयातना होत्या. मला हे आठवत नाही की आग लागल्यापासून मी कितीवेळ त्या इमारतीमध्ये होते. मी कशीबशी मनाची तयारी केली आणि उडी मारली. उडी मारता क्षणी मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. मी जगेन की नाही ते कळतंच नव्हतं, पण मी वाचले असं १५ वर्षाची विद्यार्थिनी पांचालीने म्हटलं आहे. त्यानंतर प्रत्येकजण मदतीसाठी आणि बचावासाठी आरडाओरडा करत रडत होता हेच चित्र मला आठवतंय असंही पांचालीने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका मुलीनेही असाच अनुभव सांगितला आहे.

आग लागल्याने प्रचंड धूर झाला होता, आम्हाला श्वास घेणंही कठीण होत होतं. मी तेवढ्या घाईगडबडीत आईला फोन केला आणि पायऱ्यांच्या दिशेने धावले. मात्र पायऱ्यांजवळही आगीचे लोळ दिसत होते. पायऱ्यांवर आगीचे लोळ आणि धुराचे लोट असल्याने मी पायऱ्या उतरू शकले नाही. इतर सगळे काय करत आहेत? ते पाहिले ते सगळेजण शक्य आहे तिथून उड्या मारत होते. मग मीदेखील फारसा विचार केला नाही आणि उडी टाकली असं उर्मिला या विद्यार्थिनीने म्हटले आहे. उडी मारली तेव्हा उर्मिलाच्या मांडीला, पाठीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्यावर पी. पी. सावनी या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.