बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनांनी भयभीत झालेल्या काबूलवासीयांची शनिवारची सकाळ रम्य वातावरणात उगवली. सकाळीच नागरिकांना शांततेचे प्रतीक असलेले, गुलाबी रंगाचे १० हजार फुगे प्रेमाची भेट म्हणून  मिळाले.शनिवारी सकाळी १०० हून अधिक तरुण काबुली कलाकार आणि विद्यार्थ्यांनी कामगार, दुकानदार आणि कुटुंबीयांना फिक्या गुलाबी रंगाच्या हजारो फुग्यांचे वाटप केले. उन्हाळा, धुळीचे प्राबल्य असलेल्या शहरवासीयांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरला. शहराच्या प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी नागरिकांना एक एक फुगा देण्यात आला आणि दिवसाअखेरीपर्यंत आपल्याजवळ हा फुगा जपून ठेवावा, असा प्रेमळ आग्रह त्यांना करण्यात आला.
गेली अनेक दशके युद्धाच्या खाईत होरपळून निघालेल्या काबूलवासीयांसाठी शनिवारचा दिवस आगळावेगळा ठरला आणि त्याला कारणीभूत ठरला अमेरिकेचा सर्जनशील कलाकार यामेन्झी आबरेलेडा. यामेन्झी यांनी ही अद्भुत कल्पना राबवून नागरिकांना फुगे देण्याचे ठरविले आणि ही कल्पना प्रत्यक्षातही उतरविली. लोकांना आश्चर्यचकित करण्याच्या हेतूने ही संकल्पना गुप्तही ठेवण्यात आली होती. तालिबानी अतिरेक्यांनी केलेला आत्मघातकी हल्ला आणि काबूलच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन’च्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आल्यानंतर काही तासांतच हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्यामुळेही त्याची वेळ गुप्त ठेवण्यात आली होती. अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे या कार्यक्रमाच्या पूर्ततेबद्दल काही शंकाही होत्या, परंतु कार्यकर्त्यांनी त्यासाठी कमालीचा आग्रह धरला आणि हा कार्यक्रम पार पडला. मी माझ्या घरातूनही स्फोटांचे आवाज ऐकत होतो, परंतु प्रत्येकजण त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम पार पाडत होता आणि शेवटच्या क्षणापर्यंतच्या कामाच्या तयारीवर कोणताही परिणाम झाला नाही, असे यामेन्झी आबरेलेडा यांनी आवर्जून सांगितले. शहरात एवढे सगळे भीषण घडूनही या कार्यक्रमातून आपल्याला सकारात्मक, प्रेमळ आणि सर्जनशील असे अनोखे पाहायला, अनुभवायला मिळाले, त्यामुळे लोक कमालीचे आनंदित झाले, असेही ते म्हणाले. आबरेलेडा यांनी यापूर्वीही केनियातील नैरोबी, जपानमधील यामागुची व भारतात बंगळुरू येथे असे कार्यक्रम राबविले असून, तेथेही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.