कर्नाटकमध्ये मतदान संपल्यानंतर लगेचच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्यास सुरूवात केली आहे. कर्नाटक निवडणुकीदरम्यान १९ दिवस स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी सलग तिस-या दिवशी वाढवण्यात आले आहेत. सलग तीन दिवस झालेल्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर एकूण ४६ ते ५० पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये गेल्या तीन दिवसात ४८ ते ६९ पैशांची वाढ झाली आहे.

बुधवारी दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १५ पैशांनी तर दिल्लीत डिझेल २१ पैसे आणि मुंबईत २२ पैशांनी वाढलं आहे. आज सकाळी ६ वाजेपासूनच नवे वाढीव दर लागू झाले आहेत. मुंबईतील आजचा पेट्रोलचा प्रतिलीटर दर 82.94 रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलीटर 70.88 रुपये एवढा आहे.

१२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.