कर्नाटक निकालानंतर देशाच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेला विश्वास आणखी दृढ झाला. आम्हाला बहुमतासाठी काही जागा कमी पडत आहेत तर काँग्रेसच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मात्र तुम्ही कुठून कुठे आलात? याचा विचार केला आहे का? काँग्रेसने मनी पॉवर आणि मसल पॉवरचा वापर केला. राहुल गांधी तुम्ही या सगळ्याला राजकारण म्हणता का? असे प्रश्न विचारत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

कर्नाटकात आम्ही विजयाच्या अगदी जवळ पोहचलो आहोत. जनतेने आम्हाला बहुमताजवळ पोहचवले आहे. आम्ही त्यासाठी कर्नाटकच्या जनतेचे आभारी आहोत. काँग्रेसने सगळ्या प्रकारे ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने फक्त भाजपाला आणि विकासालाच मत दिले आहे. आत्तापर्यंत १५ राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्या सगळ्या ठिकाणी भाजपाने यश मिळवले. येत्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाला यश मिळणार आहे, तसेच २०१९ ला भाजपाला आणि एनडीएलाच बहुमत मिळेल असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही अमित शाह यांनी आभार मानले. काँग्रेसने फक्त व्होट बँकेचे राजकारण केले. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनाही धूळ चारली अशीही टीका अमित शाह यांनी केली.