२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला बुधवारी पुण्यात फासावर लटकवण्यात आल्यानंतर या कृत्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानमधील तालिबान्यांनी धमकी देताना भारतीयांना लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी आम्ही कोणाही भारतीयाला लक्ष्य करू, अशी धमकी देताना लष्कर-ए-तय्यबाने कसाबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करावा, अशी मागणीही केली आहे.
तेहरिक-ए-तालिबानचा प्रवक्ता इहसानुल्लाह इहसान याने वायव्य पाकिस्तानातील पत्रकारांना कसाबला फाशी दिल्यानंतर दूरध्वनी केले. त्यात कसाबच्या फाशीचा सूड उगवण्यासाठी आपली संघटना भारतीयांना वा भारतीयांचे ‘हित’ जोपासल्या जाणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करेल, असे इहसानने सांगितले. भारताने २५ वर्षीय कसाबचा मृतदेह त्याच्या पाकिस्तानातील कुटुंबीयांच्या अथवा तालिबान्यांच्या हवाली करावा. तसे न घडल्यास आम्हीही भारतीयांना लक्ष्य करून त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देणार नाही, अशी धमकी इहसानने दिली आहे. २५ वर्षीय कसाबला बुधवारी पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच परिसरात दफन करण्यात आला. पाकिस्ताननेही यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला पाकिस्तान नेहमीच विरोध करेल व या प्रश्नी सामोरे जाणाऱ्या देशांना आम्ही सदैव सहकार्य करू, असे म्हटले होते.  कसाबच्या फाशीनंतर व तालिबान्यांनी दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. याअगोदरही पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाला धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. २०१० मध्ये निमलष्करी दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना पाकिस्तानातील तालिबान्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानातील भारतीय दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना पळवून नेणे, विदेशी संस्थांना लक्ष्य करण्याचा कट रचल्याची माहिती त्यांच्या चौकशीत पुढे आली होती.
भारतीय उच्चायुक्तांचे अपहरण करून त्यांच्या बदल्यात पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या तालिबान्यांना सोडवण्याचीही त्यांची योजना होती. हा कट उघड झाल्यानंतरही येथील भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.