विवाहबाह्य संबंधांमध्ये अडथळा नको म्हणून काही जण हत्येचे टोकाच पाऊल उचलतात. मार्गातील अडथळा दूर झाला की, आयुष्य सुखात घालवता येईल हा त्यांचा गुन्हा करण्यामागचा उद्देश असतो. पण बंगळुरुमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले असून यामध्ये पती, पत्नी आणि वो तिघांचा मृत्यू झाला आहे. राजाराजेश्वरी नगरचे पोलीस एका ३२ वर्षीय गृहिणीच्या आत्महत्येचा तपास करताना, प्रियकराने तिला कुरीयरने दागिने पाठवल्याचे समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
विवाहबाह्य संबंधांच्या या प्रकरणात डॉ. रेवांत, हर्षिता आणि कविता या तिघांचा मृत्यू झाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या रेवांतने १७ फेब्रुवारीला चिक्कमंगळुरु जिल्ह्यातील कादूर येथे पत्नी कविताची हत्या केली. त्यानंतर तिचे दागिने कुरीयने हर्षिताला पाठवले.

मग डॉक्टर रेवांतने काय केले?
कविताच्या हत्येच्या प्रकरणात आपण अडकणार हे लक्षात आल्यानंतर डॉ. रेवांतने शनिवारी दुपारी धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. आपले जीवन संपवण्याधी रेवांत प्रेयसी हर्षिता बरोबर फोनवरुन बोलला. कविताची हत्या आणि रेवांतची आत्महत्या याबद्दल हर्षिताला माहित होते असा पोलिसांचा कयास आहे.

हर्षिताने सुद्धा त्याच दिवशी शनिवारी रात्री राजाराजेश्वरी नगरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना मंगळवारी तिच्या घरी सोन्याचे दागिने सापडले. तुमाकूर येथे राहणाऱ्या हर्षिताचे सुदर्शन बरोबर लग्न झाले होते. तिचा नवरा केएसआरटीसीमध्ये बस चालक आहे.

रेवांतने कशी केली पत्नीची हत्या?
१७ फेब्रवारीला संध्याकाळी ४.३०च्या सुमारास डॉ. रेवांतने पत्नी कविताला आधी गुंगीचे इंजेक्शन दिले. नंतर बेशुद्धावस्थेत असलेल्या कविताची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर रेवांतने घरातील आणि कविताच्या अंगावरील सर्व दागिने काढले व बीरुर येथे जाऊन  ते सर्व दागिने कुरीयरने हर्षिताला पाठवले अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. कविताच्या मृत्यूला हत्या भासवण्याचा डॉक्टर रेवांतचा प्रयत्न होता. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल.