विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दिल्लीमध्ये पोलीस उपनिरीक्षक महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षणाच्या काळात बॅचमेट असलेल्या पोलीस उपनिरीक्षकानं महिलेची हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही रिलेशनमध्ये होते. त्यामुळे प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झालं. त्यांच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी रात्री एका महिला उपनिरीक्षकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. प्रिती अहलावत असं या मयत पोलीस उपनिरीक्षक महिलेचं नाव आहे. त्या पतपरगंज औद्योगिक परिसर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तर दिपांशू राठी असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे. तो दिल्लीच्या भजनपुरा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. प्रिती यांची  घरी जात असताना शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास रोहिणी ईस्ट मेट्रो स्टेशन आरोपीनं गोळी घालून हत्या केली. प्रिती यांची हत्या केल्यानंतर दिपांशूनं हरियाणाच्या सोनिपत येथे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलीस पोहोचले पण…

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी रोहिणी ईस्ट मेट्रो स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच प्रिती यांच्या फोनवर आलेल्या कॉलही पोलिसांनी चेक केले. त्यानंतर पोलिसांना दीपांशु राठीवर संशय आला. दीपांशुच्या कार्यालयाशी दिल्ली पोलिसांनी संपर्क केला. फोनही ट्रॅक केला. त्यावेळी तो मृथल येथे असल्याचं कळालं. सोनिपत पोलिसांच्या मदतीनं दिल्ली पोलीस ट्रॅक केलेल्या ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी राठीची कार दिसली. पोलीस कार जवळ पोहोचले, त्यावेळी कार सुरूच होती. तर कारमध्ये दीपांशु मृतावस्थेत आढळून आला. त्याने गोळी झाडून आत्महत्या केली,” अशी माहिती रोहिणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. डी. मिश्रा यांनी दिली.

तीन दिवस रेकी

प्रिती आणि दीपांशु २०१८च्या बॅचमध्ये सोबत होते. त्यानंतर दोघे रिलेशनमध्ये होते. काही महिन्यापूर्वी त्याचं ब्रेकअप झालं होत. सध्या प्रिती तिच्या दोन बॅचमेटसोबत रोहिणी येथे राहत होती. त्यामुळे प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्याच्या दोघांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे दीपांशुनं प्रितीची हत्या करण्यापूर्वी रेकी केली. तीन दिवस तो प्रिती कोणत्या रस्त्यानं जाते, याची माहिती करून घेतली, असं पोलिसांनी म्हटलं आहे.