X
X

शिवसेनेपाठोपाठ भाजपा NDA मधल्या आणखी एक पक्षामुळे हैराण

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील आणखी एका घटक पक्षाने भाजपाला झटका दिला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील आणखी एका घटक पक्षाने भाजपाला झटका दिला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील लोक जनशक्ती पार्टीने झारखंड विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

२३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवानकडे आता पक्षाची सूत्रे आहेत. भाजपासोबत आघाडी न करता निवडणूक लढवण्याच्या मुद्दावर चिराग पासवान म्हणाले की, निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाच्या प्रदेश शाखेचा आहे. लोक जनशक्ती पार्टीने ५० जागा स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पहिली उमेदवार यादी जाहीर होईल असे चिराग पासवान म्हणाले.

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनेही झारखंड विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपा, एलजेपी आणि जेडीयूचे आघाडी सरकार आहे. भाजपा एजेएसयूसोबत मिळून झारखंड विधानसभेची निवडणूक लढवत आहे. भाजपाने रविवारीच ५२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेने धक्का दिला आहे. दोघांनी युती करुन एकत्र निवडणूक लढवली. जनादेशही युतीला मिळाला. पण मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्यावरुन मतभेद झाल्यानंतर युतीत बिघाडी झाली. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

22
Just Now!
X