ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत स्वदेशी कंपन्या मारुति आणि हिरोनंतर आता अशोक लेलँडमध्येही उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनांच्या मागणीत खूपच घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे हिंदुजा ग्रुपने म्हटले आहे.

हिंदुजा ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या अशोक लेलँडने सोमवारी सांगितले की, आमच्या विविध प्लांटमध्ये सप्टेंबर २०१९ पासून वाहनांच्या मागणीत कमालीची घट झाल्याने उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेतील सुस्तीच्या स्थितीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक वाहन उत्पादक आणि सुटे भाग पुरवठादारांनी आपल्या उत्पादनात कपात केली असून अनेकांनी प्लांट तात्पुरते बंद ठेवले आहेत.

दरम्यान, चेन्नईस्थित अवजड व्यावसायिक वाहने बनवणाऱ्या अशोक लेलँडने इन्नोर येथील प्लांटमध्ये १६ काम बंद राहिल असे घोषित केले आहे. तसेच होसूर (तामिळनाडू) येथील युनिटमध्ये ५ दिवस, अलवार (राजस्थान) आणि भंडारा (महाराष्ट्र) येथील प्लांटसाठी प्रत्येकी १० दिवस आणि पंतनगर (उत्तराखंड) येथील प्लांटमध्ये १८ दिवस काम बंद असणार आहे.

गेल्या महिन्यांत चेन्नईतील टीव्हीएस ग्रुपने, वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या सुंदराम क्लायटॉनने, ऑटोमोबाईलमधील आघाडीची कंपनी मारुती सुझुकी आणि दुचाक्या बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या उत्पादनात कपातीची घोषणा केली होती. जोपर्यंत बाजारातून पुरेशी मागणी येत नाही तोपर्यंत हे प्लांट बंद राहणार असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपन्यांनी देखील बाजारातील मागणीनुसार उत्पादनात ताळमेळ राखण्यासाठी त्यांच्या वाहनांचे उत्पादन थांबवले आहे.

आज जाहीर झालेल्या कार विक्रीच्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये वार्षिक ३१.५७ टक्क्यांनी घसरली आहे. त्यानुसार १,९६,५२४ इतक्या वाहनांच्या विक्रीची नोंद झाली असून ती थेट दहाव्या महिन्यात घसरली आहे. १९९७-९८ मध्ये सियामने डेटा रेकॉर्ड करणे सुरू केल्यापासून या दोन्ही प्रकारातील ही सर्वात वाईट घसरण आहे.