अमेरिकेत नुकतीच १२ वर्षांवरील मुलांना देखील लसीकरणाची सुरुवात झाली. अजूनही अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधितांचा आकडा असला, तरी व्यापक प्रमाणावर लसीकरण सुरू केल्यामुळे अमेरिकेत परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्यास विनामास्क फिरण्याची मुभा दिल्यामुळे अमेरिकन जनतेमध्ये काहीसं आशादायी वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत जनसामान्यांमध्ये एकंदरीतच लसीकरणाबद्दल आणि तिथे येऊ घातलेल्या ‘न्यू नॉर्मल’ जीवनमानाबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा लोकसत्ता डॉट कॉमनं प्रयत्न केला. अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना भागात राहणारे अमित दाभोळकर यांनी आपले अनुभव सांगितले आहेत.

“आमच्या मित्र-परिवारामध्ये सगळ्यांचे दोन डोस झाले आहेत. मास्कबाबतचं बंधन काढलं असलं, तरी दुकानात किंवा बाहेर जाताना आम्ही मास्क घालतोच. मास्क वापरणं आणि हात धुणं ही सवयच आता लागली आहे”, असं दाभोळकर म्हणाले आहेत.