मेहबूबा मुफ्ती व मोदी यांच्यात चर्चा

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबतचा पेच मिटण्याची चिन्हे आहेत. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. या प्रश्नातील सर्व मुद्दय़ांवर झालेली चर्चा चांगली होती, सकारात्मक होती असे मेहबूबा यांनी सांगितले.
मेहबूबा मुफ्ती व भाजप नेत्यांमध्ये तीनच दिवसांपूर्वी सरकार स्थापनेबाबत अनेक मुद्दय़ांवर मतभेद झाले होते व कुठल्याच प्रश्नावर तडजोड करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्या वेळी भाजप नेते राम माधव यांनी पीडीपीच्या कुठल्याही अटी आम्ही मान्य करणार नाही, असे म्हटले होते. मेहबूबा यांनी दिल्लीत आल्यानंतर त्या थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी गेल्या. पंतप्रधान मोदी यांच्याशी मेहबूबा यांनी तीस मिनिटे चर्चा केली. त्या म्हणाल्या, की चर्चा सकारात्मक झाली आहे. गेले दोन ते तीन महिने सरकार स्थापनेचा पेच कायम आहे पण आज मी समाधानी आहे. खूप खूप समाधानी आहे.
दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी आमदारांना या वाटाघाटींची माहिती देण्याचे ठरवले असून त्या तातडीने श्रीनगरला गेल्या आहेत. त्या म्हणाल्या, की गुरुवारी पीडीपी आमदारांच्या बैठकीत मी पुढील कृती कार्यक्रम जाहीर करणार आहे. सरकार स्थापनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की मी आमदारांशी बोलेन कारण तोच एक मंच त्यासाठी आहे, येथे मी आताच तुम्हाला काही सांगू शकत नाही, कुठली घोषणा कुठे करावी याचे तारतम्य बाळगावे लागते. मी श्रीनगरला परत जात असून तेथे पुढील घोषणा करीन.